मुंबई : मोठं आणि आरामदायक घर असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. अनेकजण हे स्वप्न साकारण्यासाठी खूप मेहनत घेतात. अनेक लोक हक्काच्या घरासाठी जीवाचं रान करत असतात. पण आता मुंबईत एक प्रयोग करून तुम्ही सध्या राहत असलेल्या घरापेक्षा दहापट मोठे घर मिळवू शकता. ते कसं चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. तुम्ही ज्या इमारतीत राहतात ती इमारत जर जुनी झाली असेल तर त्या इमारतीचा पुनर्विकास (Building Redevelopment) करण्यासाठी बिल्डर शोधला जातो. अशा वेळेला अनेक प्रश्न मनात येत असतात. जुनी इमारत पुनर्विकासासाठी देताना योग्य बिल्डर मिळेल का? काम वेळेत पूर्ण होईल का? अशी चिंता मनाला त्रास देत असते. पण आता थांबा! आता तुम्ही स्वतःच तुमच्या इमारतीचा पुनर्विकास करू शकता आणि दहापट मोठे घर मिळवू शकता.
मुंबईत सेल्फ रिडेव्हलपमेंटचे अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत आणि अनेक रहिवाशांना त्याचा थेट फायदा मिळाला आहे. खरं तर, काहींना पुनर्विकासानंतर दुप्पट नव्हे, तर दहापट मोठं घर मिळालं आहे. त्यामुळे, जर तुम्हीही इमारतीच्या पुनर्विकासाचा विचार करत असाल, तर हा पर्याय नक्कीच विचार करण्यासारखा आहे.
विलेपार्ले पूर्व भागात ऐतिहासिक सेल्फ-रिडेव्हलपमेंट!
मुंबईत विलेपार्ले पूर्व भागातील नंददीप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 16 सभासदांनी कोणत्याही खासगी विकासकाची मदत न घेता स्वतःच आपल्या इमारतीचा यशस्वी पुनर्विकास (Redevelopment) केला आहे. त्यांनी 10 मजली नवी इमारत उभारून 21 सदनिका बांधल्या आणि कोणत्याही दलालांविना त्यांची विक्रीही यशस्वीरित्या पूर्ण केली.
विशेष म्हणजे, हा सेल्फ-रिडेव्हलपमेंट प्रकल्प कोणत्याही बिल्डर किंवा खाजगी बँकेच्या मदत न घेता पूर्ण केला आहे. मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने आणि इमारतीतील तीन सदनिका विक्री करून हा प्रकल्प यशस्वीरीत्या उभा करण्यात आला आहे. हा प्रयोग मुंबईतील इतर सोसायट्यांसाठी एक आदर्श ठरू शकतो!
पुनर्विकासाचा मोठा लाभ, सभासदांना मिळाली दुप्पटपेक्षा मोठी घरे!
मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या हस्ते नंददीप सोसायटीच्या सभासदांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आहे. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी स्वयंपूर्ण पुनर्विकास (Self Redevelopment) हा फायद्याचा पर्याय असल्याचे स्पष्ट केले. पुनर्विकासामुळे फक्त अडीच वर्षातच सभासदांना हक्काची आणि पूर्वीपेक्षा खूप मोठी घरे मिळाली. त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विशेष म्हणजे, पूर्वी 400 चौरस फूट जागेत राहणारे सभासद आता तब्बल 1400 चौरस फुटांच्या घरात राहायला जाणार आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा या यशस्वी प्रयोगाचा सर्वात मोठा पुरावा असल्याचे दिसत आहे.
येथे वाचा – आज लोनवर घर घ्यावे की भाड्याने रहावे? एक्सपर्टचं ऐकाल तर फायद्यात राहाल..!
मुंबईसह इतर अनेक ठिकाणी बिल्डरांची मनमानी आणि बिल्डरांकडून ग्राहकांची होत असलेली फसवणूक सर्रास पाहायला मिळते. त्यामुळे बिल्डरांनी दिलेली आश्वासने फक्त कागदावरच राहून जातात आणि प्रत्यक्षात अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागतो. पण, मुंबईतील विलेपार्ले येथील नंददीप सोसायटीने बिल्डरशिवाय यशस्वी पुनर्विकास करत नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या स्वयंपूर्ण पुनर्विकासाच्या यशस्वी प्रयोगाने आता इतर सोसायट्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.