Home Loan EMI Tips: स्वतःचे घर असावे, हे जवळजवळ प्रत्येकाचच स्वप्नं आहे. पण आजच्या घडीला शहरांमध्ये घर घेणं म्हणजे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी गृहकर्जाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही.
घर घेणं जरी आनंदाचं असलं, तरी तेवढंच मोठं आहे कर्ज फेडण्याचं ओझं. अनेकदा लोक कर्ज घेतात, पण मासिक हप्ता म्हणजेच EMI भरताना त्यांच्या नाकीनऊ येतात. काही जण तर वेळेवर हप्ता भरू शकत नाहीत आणि अशा वेळी बँक दंड तर लावतेच, शिवाय वसुली एजंट सतत मागे लागतात ते वेगळं. यामुळे मानसिक त्रास होतो आणि कधी कधी सामाजिक प्रतिष्ठेलाही धक्का बसतो. काही दुर्दैवी लोक तर या आर्थिक ओझ्याखाली दडपून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णयही घेतात.
म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही सोप्या आणि उपयोगी टिप्स, ज्या तुमच्या गृहकर्जाच्या EMI चं ओझं थोडंफार हलकं करू शकतील. चला तर पाहूया काय आहेत ‘त्या’ टिप्स!
रेल्वे स्टेशन आणि भाजीमंडई जवळ असूनही वाशीतील सिडकोच्या घरांना नापसंती, हे आहे खरे कारण..!
बचत करून आगाऊ रक्कम भरा
तुम्ही जर घरखर्चातून थोडीशी बचत करू शकत असाल, तर त्या बचतीतून गृहकर्जाची काही रक्कम आगाऊ भरू शकता. याला प्री-पेमेंट म्हणतात. यामुळे तुमच्या कर्जाच्या मूळ रकमेवर (मुद्दल) ती रक्कम वजा होईल आणि त्याचा थेट फायदा तुमच्या EMI वर होईल. हप्ता कमी होईल आणि तुमचं आर्थिक ओझं थोडं हलकं वाटेल.
कर्जाचा कालावधी वाढवा
कधी कधी EMI जास्त असल्यामुळे तो भरणं खूप कठीण जातं. अशा वेळी तुम्ही तुमच्या कर्जाचा कालावधी वाढवू शकता. म्हणजेच जास्त वर्षांसाठी कर्ज घेऊन हप्ता कमी करू शकता. जरी यामुळे व्याज थोडं जास्त भरावं लागेल, तरी महिन्याचा EMI झेपेल असा होतो.
कर्ज हस्तांतर करा
तुम्ही सध्या ज्या बँकेकडून कर्ज घेतलंय, ती बँक जर जास्त व्याजदर लावत असेल आणि दुसऱ्या बँकेकडे कमी व्याजदरात चांगली ऑफर असेल, तर तुमचं कर्ज दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित करा. याला Home Loan Balance Transfer म्हणतात. यात फायदा असा की, नवीन बँकेचा व्याजदर कमी असल्यामुळे तुमचं EMI देखील कमी होतं. आणि हो, हा निर्णय घ्यायच्या आधी सर्व अटी नीट वाचा.
आता ठाण्यात म्हाडाचे घर घेण्याची संधी! म्हाडाची 2 हजार घरांची लॉटरी, एका क्लिकवर पहा माहिती..!
सिबिल स्कोर चांगला आहे? मग व्याजदर कमी करून घ्या!
तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल (750 पेक्षा जास्त), तर तो तुमच्या फायद्याचा आहे. कारण चांगल्या सिबिल स्कोरमुळे तुम्ही तुमच्या बँकेकडून व्याजदर कमी करून घेऊ शकता. त्यासाठी बँकेत संपर्क साधा, तुमचा सिबिल स्कोर दाखवा आणि कमी व्याजाची विनंती करा. थोडे प्रयत्न केल्यास, व्याजदर कमी होऊ शकतो आणि EMI देखील थोडा कमी होऊ शकतो.