Ready to Move vs Under Construction Property: स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मेहनतीनं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवायचा, असं प्रत्येकाला वाटतं. पण घर खरेदी करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडी टू मूव्ह फ्लॅट घ्यायचा की अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी? दोन्हींचे फायदे-तोटे आहेत, पण त्याचबरोबर दोन्हीवर लागणाऱ्या करांची माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चुकीचा निर्णय घेतला, तर तुमच्या बजेटवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच घर घेताना GST नियमांची योग्य माहिती असणं गरजेचं आहे.
रेडी टू मूव्ह फ्लॅटवर कोणताही GST नाही!
जर तुम्ही रेडी टू मूव्ह फ्लॅट घेत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे अशी की यावर कोणताही GST लागत नाही! तुम्हाला फक्त स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं, जे राज्यानुसार ५% ते १०% दरम्यान असतं. म्हणजे जर तुम्ही ५० लाख रुपयांचं घर घेत असाल, तर तुम्हाला फक्त स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन शुल्क द्यावं लागेल, जी मालमत्तेच्या एकूण किमतीच्या प्रमाणात ठरते.
पुण्याच्या या भागात चुकूनही घेऊ नका भाड्याने घर; भाडे ऐकून बसेल धक्का..!
अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीवर किती GST भरावा लागतो?
जर तुम्ही बांधकाम सुरू असलेली (अंडर कंस्ट्रक्शन) मालमत्ता घेत असाल, तर तुम्हाला GST भरावा लागेल. हा GST घराच्या प्रकारावर अवलंबून असतो.
परवडणाऱ्या घरावर फक्त १% GST लागू होतो. जर तुम्ही मध्यमवर्गीयांसाठी असलेलं परवडणारं घर खरेदी करत असाल, तर हा दर तुलनेत खूप कमी आहे.
सामान्य निवासी प्रॉपर्टीवर ५% GST लागू होतो. जर तुम्ही मोठ्या अपार्टमेंटमध्ये किंवा आलिशान घर घेत असाल, तर हा कर तुमच्या खिशाला मोठा फटका देऊ शकतो.
व्यावसायिक मालमत्तेसाठी १२% GST लागू होतो. जर तुम्ही ऑफिस, दुकान किंवा इतर कमर्शियल प्रॉपर्टी घेत असाल, तर GST चा हा दर सर्वाधिक आहे.
रेडी टू मूव्ह vs अंडर कंस्ट्रक्शन, कोणता पर्याय योग्य आहे?
खूप लोक बांधकाम सुरू असलेली मालमत्ता निवडतात कारण त्यात कधी कधी थोड्या स्वस्त दरात घर मिळू शकतं. काही डेव्हलपर इन्स्टॉलमेंट प्लॅनही देतात, त्यामुळे एकदम मोठी रक्कम भरायची वेळ येत नाही. मात्र, अशा प्रॉपर्टीजवर GST लागू होतो आणि पजेशन मिळायला वेळ लागू शकतो. याउलट, रेडी टू मूव्ह फ्लॅट घेतल्यास तुमच्या कागदपत्रांची प्रक्रिया पटकन होते आणि तुम्ही लगेच नवीन घरात शिफ्ट होऊ शकता.
घर खरेदी करताना हा निर्णय कसा घ्यावा?
तुमचं बजेट, सध्याचा आर्थिक भार आणि लवकरात लवकर राहायला जाण्याची गरज यावर तुमचा निर्णय अवलंबून असेल. जर तुम्हाला अधिक कर भरायचा नसेल आणि त्वरित राहायला जाणं महत्त्वाचं असेल, तर रेडी टू मूव्ह घर सर्वोत्तम पर्याय आहे. पण जर तुम्हाला काही काळ वाट पाहायला हरकत नसेल आणि हप्त्यांमध्ये पैसे द्यायचे असतील, तर अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी घेणंही योग्य ठरू शकतं.
घर खरेदी करायची घाई करू नका. GST, स्टॅम्प ड्युटी आणि एकूण खर्च यांचा नीट विचार करा. फक्त घराच्या किमतीवर न जाता त्याचं लोकेशन, डेव्हलपरची विश्वासार्हता आणि पजेशनचा कालावधीही महत्त्वाचा असतो. योग्य माहिती घेऊन विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुम्हाला भविष्यात मोठ्या आर्थिक अडचणींपासून वाचवू शकतो!