Home Loan benefits : आपल्या आजूबाजूला आपण नेहमीच पाहतो की काही लोकांकडे भरपूर पैसा असूनही ते घर खरेदीसाठी होम लोन (Home Loan) घेतात. अशावेळी मनात प्रश्न येतो की इतका पैसा असूनही लोन घेण्याची काय गरज? खरं म्हणजे, यामागे अशी काही स्मार्ट कारणं आहे जी ऐकून तुम्हालाही होम लोन घेण्याची इच्छा होईल. होम लोन घेतल्यामुळे त्यांना केवळ पैशांची मदत मिळते असं नाही, तर त्यातून होम लोन घेणाऱ्यांना अनेक फायदे होतात. याच कारणामुळे, अनेक लोक पैशाची कमतरता नसताना देखील होम लोन घेण्याचा निर्णय घेतात. जर या मागचं अर्थशास्त्र आपण समजून घेतलं, तर तुम्ही म्हणाल – खरंच घर खरेदीसाठी होम लोन घेणं किती फायद्याचं आहे.. चला तर मग, पाहूया होम लोनमागची ही खरी कारणं आणि त्यातून मिळणारे फायदे…
घर खरेदीसाठी होम लोन (Home Loan) हा खूप मोठा आधार ठरतो. मात्र, त्याचबरोबर लोन परतफेड करण्याची दीर्घकालीन जबाबदारीही वाढते. अनेकांना त्यामुळे हे ओझं वाटतं. पण खरी गोष्ट अशी आहे की, होम लोन म्हणजे फक्त कर्जाचं ओझं नाही, तर त्यातून अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात. हे फायदे श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या हुशार लोक चांगलेच ओळखतात. म्हणूनच करोडो रुपयांची संपत्ती असूनही श्रीमंत लोक घर खरेदीसाठी बँकेकडून होम लोन घेतात. चला तर मग जाणून घेऊया होम लोन घेण्याचे नेमके फायदे कोणकोणते आहेत..
येथे वाचा – आता मिळवा दहापट मोठे घर; फक्त करा हा एक प्रयोग..!
(1) होम लोन घेण्याचा पहिला फायदा (Home Loan benefits)
होम लोन घेतल्यावर मिळणारा पहिला आणि खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची मालमत्ता कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित असल्याची खात्री मिळते. कारण बँक किंवा आर्थिक संस्था लोन मंजूर करण्याआधी त्या घराची किंवा फ्लॅटची सखोल चौकशी करते. बँक लोन मंजूर करण्याआधी त्या मालमत्तेची सगळी कागदपत्रं नीट तपासते. ती मालमत्ता कुठल्या वादात अडकलेली तर नाही ना, तिच्यावर आधीपासून कर्ज बाकी तर नाही ना, आणि सगळी कागदपत्रं खरी व पूर्ण आहेत का, अशा गोष्टीची बारकाईने चौकशी बँक करते. म्हणूनच जेव्हा बँक तुमचं लोन मंजूर करून देते, तेव्हा एक प्रकारे ती मालमत्ता क्लिअर असल्याचं शिक्कामोर्तब झालेलं असतं. त्यामुळे होम लोन घेतल्याने घर किंवा मालमत्ता कायदेशीर अडचणीत नाही हे दिसून येते.
(2) होम लोन घेण्याचा दुसरा फायदा
होम लोन घेतल्याने आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा फायदा होतो. तो म्हणजे टॅक्स बचत. म्हणूनच बरेच करदाते, म्हणजे जे दरवर्षी आयकर भरतात असे लोक घर खरेदीसाठी होम लोन घेण्याचा निर्णय घेतात. कारण होम लोन घेतल्यास आयकरात आकर्षक सवलती मिळतात. विशेषतः, आयकर अधिनियमातील कलम 24(B) अंतर्गत तुम्हाला लोनवरील व्याजावर दरवर्षी जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत करसवलत मिळते. म्हणजेच, घर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावर जे व्याज तुम्ही भरणार आहात त्यावर तुम्हाला फायदा मिळणार आहे.
(3) पहा होम लोनचा तिसरा फायदा
होम लोन घेण्याचा तिसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत खूपच कमी असतो. उदाहरणार्थ, तुम्ही पर्सनल लोन घेतलं तर त्यावर भरपूर जास्त व्याज भरावं लागतं. पण घर खरेदीसाठी घेतलेलं होम लोन तुलनेने खूप स्वस्त पडतं.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की यात “नेमका किती फरक असतो?” तर खरं सांगायचं झालं तर पर्सनल लोन आणि होम लोनच्या व्याजदरांमध्ये मोठी तफावत असते. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक दृष्टीने होम लोन खूप फायदेशीर ठरतं. याशिवाय, भविष्यात महागाई कमी झाली, तर होम लोनचा व्याजदरदेखील घटू शकतो. याचा थेट फायदा तुम्हाला मिळतो, तुमचे मासिक हप्ते (EMI) कमी होतात आणि एकूण खर्चातही मोठी बचत होते.
(4) होम लोनचा चौथा मोठा फायदा
होम लोन घेण्याचा चौथा आणि खास फायदा असा आहे की त्यावर टॉप-अप लोन (Top up loan) मिळतं. आता हे टॉप-अप लोन म्हणजे नक्की काय? समजा, तुम्ही जर एखादं जुनं घर विकत घेतलं, तर त्यात थोडाफार बदल केलाच जातो. जसं की किचनचं रिनोव्हेशन, घराचं रंगकाम, बाथरूममध्ये बदल किंवा छोट्या-मोठ्या दुरुस्त्या. अशा वेळी स्वतंत्रपणे नवीन लोन घेण्याची गरज लागत नाही. कारण, तुम्ही घेतलेल्या होम लोनवर तुम्हाला टॉप-अप लोन (Top up loan) मिळू शकते. यासाठी फारशी कागदपत्रंही लागत नाहीत आणि प्रक्रिया सोपी असते. यामुळे घराच्या देखभालीपासून ते नूतनीकरणापर्यंत अनेक खर्च सहज भागवता येतात. म्हणूनच, होम लोनसोबत टॉप-अप लोन ही सुविधा खरोखरच तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.