Home Construction Tips: स्वतःचं घर असावं, हक्काचं, सुरक्षित, आणि तिथे आपल्या माणसांसोबत सुखानं राहता यावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण सध्याच्या महागाईमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणं अनेकांना कठीण वाटतं. भाड्याच्या घरात राहणं म्हणजे महिन्यागणिक पैसे जात राहतात, पण स्वतःचं घर बांधायचं म्हटलं तरी प्रचंड खर्चाचा विचार करूनच अनेक जण गप्प बसतात. अपार्टमेंट खरेदी करणं महाग झालंय, आणि स्वतःचं घर बांधायचं असेल तर त्याचा खर्च सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. पण जर योग्य नियोजन आणि स्मार्ट बांधकाम तंत्र वापरलं, तर फक्त ५ लाख रुपयांतही भक्कम आणि सुंदर घर उभं राहू शकतं!
घर बांधताना सर्वात महत्त्वाचं असतं जागेची निवड आणि डिझाईन. जर घराचं डिझाईन योग्य प्रकारे आखलं, तर खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो. लोड बेअरिंग स्ट्रक्चरचा वापर केल्यास कॉलम आणि बीमची गरज लागत नाही, त्यामुळे लोखंड, सिमेंट आणि वाळू यासारख्या महागड्या गोष्टींवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो. त्याचप्रमाणे, साधं आणि चौकोनी डिझाईन ठेवल्यास बांधकामाचा खर्च कमी होतो. जास्त आकर्षक, फॅन्सी आणि गुंतागुंतीच्या रचनांसाठी अधिक साहित्य आणि मजुरी लागत असल्याने ते टाळणं फायद्याचं ठरतं.
मुंबईकरांनो! घर की दुकान… काय घ्यावे? जास्त फायदा कशात? पहा तुमच्या फायद्याची माहिती..!
बांधकामात मोठी बचत करण्यासाठी फ्लाय ॲश विटांचा वापर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सामान्य विटांपेक्षा या विटा स्वस्त आणि टिकाऊ असतात. साधारण ५००० विटांसाठी ₹५०,००० खर्च येतो, पण जर फ्लाय ॲश विटा वापरल्या, तर तो खर्च फक्त ₹२५,००० होतो. म्हणजेच थेट ₹२५,००० ची बचत! एवढंच नाही, तर या विटांना प्लास्टर करण्याची गरज नसते, त्यामुळे सिमेंट आणि मजुरीचा खर्चही कमी होतो.
घराच्या रचनेत थोडेसे बदल केले तरी लाखोंची बचत होऊ शकते. उदा. शौचालय आणि स्नानगृह वेगळ्या जागी बांधण्याऐवजी एकत्र केल्यास विटा, सिमेंट आणि वाळू यावर होणारा खर्च कमी होतो. त्याशिवाय, भिंतींची लांबी कमी केल्यास बांधकाम साहित्याचा वापरही मर्यादित ठेवता येतो. फ्लोअरिंगसाठी संगमरवरी टाइल्सऐवजी सिरेमिक टाइल्स वापरल्या, तर खर्च नक्कीच कमी होतो आणि देखभाल करायलाही सोपं जातं.
घर बांधताना वाळूचा योग्य वापर करणेही खूप महत्त्वाचं आहे. सामान्यतः वाळूसाठी जवळपास ₹७५,००० पर्यंत खर्च होतो. पण जर नियोजनपूर्वक बांधकाम केलं, तर हा खर्च ₹५०,००० पर्यंत मर्यादित करता येतो. म्हणजेच पुन्हा जवळपास ₹२५,००० ची बचत.
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पूर्वनिर्मित (Pre-fabricated) साहित्य वापरूनही घर बांधणं स्वस्त आणि सोपं झालं आहे. लाकडाऐवजी स्टील किंवा अल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या-दरवाजे वापरले, तर खर्च कमी होतो आणि टिकाऊपणाही वाढतो. बांधकामासाठी लागणारं साहित्य स्थानिक पातळीवर खरेदी केल्यास वाहतुकीचा खर्च वाचतो. शिवाय, बांधकामाची वेळ योग्य प्रकारे नियोजित केली, तर मजुरीच्या वाढत्या दरांचा फटका बसत नाही आणि अजून बचत होते.
बरेच लोक असा विचार करतात की कमी बजेटमध्ये घर बांधणं शक्य नाही, पण योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण आणि स्मार्ट तंत्र वापरल्यास हे सहज शक्य आहे. कॉलम-बीम न वापरणं, प्लास्टरचा खर्च कमी करणं, फ्लाय ॲश विटांचा उपयोग करणं, चौकोनी आणि साधं डिझाईन ठेवणं, अशा अनेक गोष्टी केल्यास फक्त ५ लाखांतही सुंदर, मजबूत आणि स्वप्नासारखं घर उभं राहू शकतं.