मुंबईत फक्त 12 लाखात घर; त्यातही 3 लाखांपर्यंत सबसिडी, “या” वेबसाईटवर करता येणार नोंदणी..!

Mumbai Housing : मुंबईत ज्या लोकांचे घर नाही अशा लोकांना आता मुंबईत अतिशय परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) पंतप्रधान आवास योजना 2  मधून तब्बल एक लाख घरे बांधण्यात येणार आहे. ज्या लोकांच्या नावावर आपलं स्वतःचं घर नाही, अशा लोकांसाठी ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही घरे आकाराने मोठी, खिशाला परवडणारी आणि त्यातही जवळपास 3 लाखांचे अनुदान मिळणार असल्याने मुंबईत आपल्या स्वप्नातलं घर घेण्याची ही मोठी संधी असणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचं कामकाज पाहणारे आणि देखरेख करणारे अधिकारी अजित कवडे यांच्याकडून अशी माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान आवास योजना 1 च्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रामध्ये (एमएमआर) 70 ते 80 हजार एवढी परवडणारी घरे (Affordable flats) उपलब्ध करून दिली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता पंतप्रधान आवास योजना 2 सुरू केली जात आहे, अशी माहिती अजित कवडे यांनी दिली. पंतप्रधान आवास योजना 2 या नव्या योजनेअंतर्गत, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सुमारे 1 लाख घरे बांधली जाणार असून, त्यांचा आकार 300 ते 450 चौरस फूट एवढा असणार आहे.

मुंबईत फक्त 12 लाखात घर घेण्याची संधी

या घरांच्या किंमती 12 ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असतील असे नियोजन केले जात असल्याने ही घरे सर्वसामान्य, गोर-गरिबांच्या आवाक्यात असणार आहे. याशिवाय सरकारकडून 2 ते 3 लाख रुपयांची सबसिडी (Subsidy) देखील मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे घरे त्यांच्यासाठी बांधली जाणार आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात येतात. या लोकांसाठी ही योजना असणार आहेत. फक्त मुंबई महानगर क्षेत्रच नाही, तर महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही सुमारे 5 लाख घरे बांधण्याचे नियोजन आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) जिथे घरांची संख्या कमी आहे आणि नागरीकरण वेगाने वाढण्याची शक्यता आहे, तिथे ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वाढवण बंदराच्या जवळ ही घरे असण्याची शक्यता आहे. तसेच, म्हाडा आणि सिडको या सरकारी संस्थादेखील अशा परवडणाऱ्या घरांची सोय करणार आहेत. ज्या भागामध्ये घरांची मागणी जास्त आहे, तिथे ही घरे उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती प्रकल्प अधिकारी अजित कवडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

या घरांसाठी नोंदणी कशी करावी?

या घरांसाठी तुम्हाला नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्ही https://pmaymis.gov.in सरकारच्या या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकता. तसेच, राज्यस्तरीय व्यवस्थापन यंत्रणा आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) यांच्यामार्फत देखील नोंदणी करू शकता. ही योजना गोरगरिबांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सरकार आता दुसऱ्या टप्प्यात अधिक चांगली आणि मोठी घरे बांधण्यावर भर देत आहे. पहिल्या टप्प्यात काही घरांच्या जास्त किंमती आणि ठिकाणांमुळे ती घरे विकली गेली नव्हती. त्यामुळे या नव्या टप्प्यात त्या चुका सुधारण्यावर सरकारचे लक्ष असेल.

व्हिडिओ पहा

Leave a Comment