Mumbai Mhada Scheme : मुंबई व मुंबई उपनगरात घर घेणे सध्या सर्वांनाच परवडेल असं नाही. मुंबईत घराच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना घर खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळेच मुंबईतील अनेक लोक म्हाडाची घरे (Mhada Flats) मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. म्हाडाने मागच्या वर्षी (2024 मध्ये) घरांची योजना आणली होती. त्यानंतर आता पुन्हा म्हाडा घरांसाठी योजना आणणार असल्याचं बोललं जात आहे. या योजनेत मुंबईकरांसाठी सुमारे 3 ते 4 हजार घरांचा समावेश असणार आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात कोणते प्रकल्प पूर्ण होऊ शकतात यासंदर्भात आढावा घेणे सुरू आहे. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी लवकरच घरांची योजना येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्राहकांना मिळणार ही नवीन सुविधा
घरांचे बांधकाम सुरू असतानाच त्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार करण्यात येणार असल्याने घरांच्या विजेत्यांना टप्प्याटप्प्याने घरांचे पैसे भरण्याची सुविधा मिळणार आहे. घराचे बांधकाम पूर्ण होण्यास दीड-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार पैसे भरण्यासाठी मोठा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे म्हाडाचे घर घेणे अजूनच सोपे होणार आहे. मागच्या वर्षी (2024 मध्ये) म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काढण्यात आलेल्या लॉटरीला तब्बल 1 लाख 13 हजार एवढे अर्ज आले होते. यात एका घरासाठी 55 अर्ज आले होते. त्यामुळे मागच्या सोडतीत मोठी स्पर्धा होती. हे लक्षात घेऊन म्हाडाने नवीन वर्षात पुन्हा घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे.
म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत म्हाडाकडे तयार असलेल्या घरांची संख्या किंवा ओसी मिळालेल्या घरांची संख्या कमी आहे. त्यामुळेच बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमधील घरांची सोडत काढण्याचे नियोजन सध्या सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांनी 25 टक्के रक्कम भरली तरच म्हाडाकडून होम लोनसाठी एनओसी (NOC) दिली जाते. आता ग्राहकांना टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची सुविधा मिळणार आहे. घरांची सोडत काढत असताना ही घरे कधीपर्यंत पूर्ण होतील आणि घराचा ताबा कधी पर्यंत मिळेल, यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे या घरांसाठी जास्तीत जास्त अर्ज येण्याची शक्यता असणार आहे.
येथे वाचा – अरे वा! महिलांनी मुंबईत घर खरेदी केल्यास मिळणार 2 लाखांची सूट, पहा योजना काय..!